कोणीतरी माझ्या बाबांना थांबवा. . .
माझे दिवस सद्द्या मजेत चालले आहेत. दिवसभर भरपुर झोपायचे, भुक लागली की उठायचे अंगालाला आळोखे-पिळोखे देत मस्त आळस द्यायाचा. तोंड वेडेवाकडे केले की आईला समजते मला भुक लागली आहे ते. मग ती मला जवळ घेते. आईचे लक्ष गेले नाहीच तर मग थोडासा सुर काडायचा एवढेच. बाकी सगळे मस्त पैकी जागेवर. भरपुर पोटोबा झाला की मग मुड असेल तर उगाच ईकडेतिकडे बघत रहायचे.
पण ह्या सगळ्यात एक गोची आहे. मलाना अजुन निट स्पष्ट दिसत नाही, त्यामुळेना समोर काय आहे तेच कळत नाही. आवाज येतो, वास ही येतो, पण दिसत नाही. आईला मी नुसत्या वासानेच ओळखतो. काय छान सुवास येतो तिचा. मला खात्री आहे ती दिसायला सुद्धा खुप सुंदर असणार. जगात सगळ्यांपेक्षा सुंदर असणार.
आईचा स्पर्श सुद्धा गुदगुल्या करुन जातो. मग इतकी छान झोप लागते की काय सांगु. आई जवळ आहे हे मला तिच्या नुसत्या वासानेच कळते.
माझे बाबा येतात रोज माझ्याशी खेळायला, गप्पा मारायला. ते खुप छान बोलतात. पण आज काही तरी त्यांचे बिनसले होते. मला काही कळले नाही, पण ते मोठ मोठ्याने घरात सगळ्यांवर ओरडत होते. आजीने मला काही तरी भरवले म्हणुन. मला काय भरवले ते कळलेच नाही, पण काही तरी वेगळॆ होते. चव नाही मला सांगता यायची. बाबांनी त्यावरुन आईला एवढे बोलायला नको होते. ती बराच वेळ रडत होती.
खर तर मला अजुन तरी काही झाले नाही, बाबांनी मात्र उगाच घर डोक्यावर घेतले. तुम्हाला सांगतो बाबांचे बाहेर फिरायला जाणेच बंद केले पाहिजे. ते असे रोज बाहेर कुठे तरी जातात, तिथे त्यांना कोण-कोण भेटतं. ती लोकं त्यांना काहीबाही सांगतात, कोणी तरी त्यांच्या डोक्यात काही तरी भरवतं, मग ते येतात डोक्यात कसले तरी खुळ घेउन आणि सगळं घर डोक्यावर घेतात. म्हणुन तुम्हाला सांगतो कोणीतरी त्यांच घराबाहेर पडनं थांबवलं पाहीजे. तेना मी भेटल्याच्या आनंदात माझ्या साठी सतत काही तरी करण्याचा प्रयत्न करत असतात. दिवसरात्र माझी काळजी करत असतात. . . त्यांना सांगा मला काही होत नाही . .

0 Comments:
Post a Comment
<< Home