ते काका कोण ?
आज सकाळी मस्त आंघोळ झाली. आधीची मावशी आता मला आंघोळ घालायला येत नाही. तिच्या ऐवजी एक आजी मला आंघोळ घालते. तिचे हात इतके मऊ आहेत की मला गुदगुल्या होतात. ती आंघोळ घालतांना माझ्याशी खुप बोलत असते. मला तिच्याशी बोलता येत नाही, पण ती खुप बडबड करत असते. त्यामुळे आंघोळ करायला मजा येते.
आंघोळ झाल्यावर मला कापडात बांधुन का ठेवतात तेच मला कळत नाही. ईथे माझे उठुन बसायचे वांदे, तेच अजुन जमत नाही आणि ह्यांना मी पळुन जायची भिती वाटते. ह्यांनी मला आणण्यासाठी बराच खर्च केला आहे ना, तो मी पळुन गेलो तर वाया जाईल अशी भिती ह्यांना सतावत असणार, दुसरे काय. आज सकाळिच मला कुठे तरी घेऊन जायची तयारी चालु होती. मला कपड्यात गुंडाळले आणि आई, बाबा व आजी मला कुठेतरी घेऊन गेले. तिथे मला एका खाटेवर झोपवले. कोणीतरी बाबाने येऊन माझे पोट दाबले. मला एकदम गम्मत वाटली. थोडे दुखले सुद्धा. मग त्यांनी पुन्हा मला उचलुन कशावर तरी ठेवले. मला त्यावर ठेवताच, माझी खाट खाली गेली. पाठीला एकदम गार वाटले.
मग कोणीतरी खुप वेळ आई-बाबांशी बोलत होते. मला आजी मांडिवर घेऊन बसली होती. तिथुन परत घरी आल्यावर दारात कोणीतरी मावशीने आम्हाला अडवलं. तिने दोन-तिन वेळा माझ्यावरुन हात फिरवला, तोंडाने काही तरी म्हंटले आणि मग आई मला आत घेऊन आली. मला काही कळलेच नाही काय झाले ते.
जाउदेणा आपल्याला काय त्याचे. . . हळु हळु कळेल सगळे.
ते काका कोण होते बरं. . .?